२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर हे भारतात येऊ शकते अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असे वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्याने केल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना पाकव्याप्त काश्मीरबाबत हे मत व्यक्त केले आहे.
तसेच, लोकांनी कांदे, बटाटे, मूग डाळ, तूर डाळ यातून बाहेर पडले पाहिजे कारण, देशच नसेल तर खरेदी करणार कुठून? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते हेही म्हणाले की, ३७० आणि ३५ ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी संसदेचे संयुक्त अधिवेशन घेत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की,काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय अशी आठवण कपिल पाटील यांनी सांगितली.
हे ही वाचा:
परीक्षा घोटाळा प्रकरणी कृषी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत…
कपिल पाटील म्हणाले की, कांदे बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नसून कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या विकासकामांची माहिती यानिमित्ताने त्यांनी दिली. कार्यक्रमास आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक वरुण पाटील हे देखील उपस्थित होते.