महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यात किराणा दुकाने आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचे ठरवले आहे. या निर्णयावरून ठाकरे सरकार टीकेचे धनी होताना दिसत असले तरी सरकारकडून मात्र या निर्णयाचे जोरदार समर्थन केले जात आहे. या संदर्भातच बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “वाईन म्हणजे दारू नाही. वाईन आणि दारू मध्ये फरक असतो” असा अजब दावा केला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या मुद्यावर सगळ्यांचाच गैरसमज झाला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. आपल्या राज्यातील शेतकरी अनेक प्रकारची फळे पिकवतात. यापैकी द्राक्ष आणि काजू पासून वाईन तयार करण्यात येते असे अजित दादांनी सांगितले. तर आपल्याकडे वाईन पिण्याचे प्रमाण कमी असून इतर राज्यात आणि परदेशातही वाईन निर्यात होते. काही देश हे पाण्याऐवजी वाईन घेतात हे आपल्या सर्वांना माहीत असून जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिले जात आहे असे म्हणत अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र
शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप
आम्ही सरकार मध्ये काम करत असताना जनतेच्या नुकसानाचे काहीही करणार नाही. सरकारने निर्णय घेताना त्यात दारू नाही तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी चुकीच्या व्हिडिओद्वारे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहे असा दावा अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना केला.
पण असे असले तरी ही ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने या निर्णयाला विरोध दर्शवला जात असून यात आता सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची भर पडली आहे. पुण्यातील व्यापारी संघटनेने या निर्णयाला विरोध केला असून सुपर मार्केट मध्ये वाईन विकणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. नेटकरीही या निर्णयावरून सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत.