देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली येथील राजपथावर संचलन पार पडले. संचलनात राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून यंदा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला.
ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर लष्कराच्या दलांच्या तुकड्यांचे संचलन पार पडले. यावेळी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला भिडणारे विंटेज रणगाडे, सेंच्युरियन रणगाडे राजपथावरील संचलनात पहिल्यांदा सहभागी झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या रेजिमेंटने संचलन केले. यामध्ये राजपूत रेजिमेंट, आसाम जॅकलाई, सिखलाई, पॅरा रेजिमेंट आणि AOC यांचा समावेश होता. हवाई दल, नौदल, सीआरपीएफ, दिल्ली पोलीस, एनसीसी आणि एनएसएसचे मार्चिंग टीम आणि बँड हेही संचलनात सहभागी होते. संचलनामध्ये बीएसएफचे उंट पथकही सहभागी होते.
बीएसएफचे ‘सीमा भवानी’ आणि आयटीबीपीचे पथक सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी बाईकवर अप्रतिम स्टंट केले. ‘सीमा भवानी’ हे बीएसएफच्या महिला सैनिकांचे पथक असून आयटीबीपीचे दुचाकी पथक प्रथमच संचलनामध्ये सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे
भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे
प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा
उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह
त्यानंतर दरवर्षी प्रमाणे यंदाही काही राज्यांचे, मंत्रालयांचे चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्राचा चित्ररथही संचलनात सहभागी झाला होता. महाराष्ट्रातील जैवविविधतेवर यंदाचा चित्ररथ साकारण्यात आला होता.भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.