मुंबईच्या मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्यात येणार असून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त असलम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या नावावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करून टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेच्या कृपाछत्राखाली मालाड पश्चिम येथील मालवणीमध्ये वीर टिपू सुलतान उद्यान साकारण्यात येत आहे. हे आहे शिवसेनेचं नव हिंदुत्व, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. सावरकरांचा अपमान सहन करायचा. ज्या टिपू सुलतानने हिंदूंची मंदिरे तोडली, हिंदू समाजाचे धर्मांतर केले त्या टिपूला गौरवण्याचे काम शिवसेनेच्या मुंबई महापालिका करत आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.
एकीकडे उर्दू शाळा आणि उर्दू तुकड्या वाढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे आणि आता हे वीर टिपू सुलतानच्या नावाने मैदान सुरू होणार आहे. भारतीय जनता पार्टी या उद्यानाच्या नावाला विरोध करेल आणि त्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव लावू देणार नाही असा निर्धार त्यांनी केल्याचे अतुल भातखळकर म्हणाले.
टिपूवादी हिंदुत्ववाद्यांना माझा इशारा आहे, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या टिपूचे तुणतुणे इथे वाजू दिले जाणार नाही… pic.twitter.com/mKegBofBN4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 25, 2022
हे ही वाचा:
‘टिपू उद्यानावरून शिवसेनेची लाचारी कळली!’
देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश
वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम
वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार
अतुल भातखळकर यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत,’ अशी टीका केली होती. तसेच ठाकरे सरकारवर मुघल ए आझम-२ काढता येईल असे हिरवे वातावरण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाले आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.