आजपासून संसदेच्या आर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरूवात झाली. आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. अभिभाषणावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला, भाषणादरम्यान घोषणाबाजी करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी घडलेला प्रकार दुर्दैवीच होता असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सकाळी ११ च्या सुमारास सुरूवात झाली. या भाषणात नव्या कायद्यांनी जुन्या अधिकारांचे उच्चाटन होणार नाही, तर या कायद्यांनी नवीन अधिकार मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रपतींनी कोविड-१९च्या महामारित मृत्युमुखी पडलेल्या सर्व संसद सदस्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भाषणाला सुरूवात केली. कोरोनातून सावरणाऱ्या भारताच्या विविध आर्थिक योजनांचा त्यांनी परामर्श घेतला. यामध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून गावी परतलेल्या मजूरांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा समावेश होता. याबरोबरच जन धन योजना आणि उज्वल योजनेचा देखील राष्ट्रपतींनी उल्लेख केला.
आत्मनिर्भरता हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे मुल्य असल्याचे सांगून आजच्या काळातल्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे झालेला फायदा देखील त्यांनी थोडक्यात विशद केला. वैद्यकीय, अभियांत्रीकी, उत्पादन अशा विविध क्षेत्रात झालेली भारताची प्रगती राष्ट्रपतींनी सदस्यांसमोर आकड्यांसह मांडली.
ही आत्मनिर्भरता शेती क्षेत्रात देखील यावी यासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. यात दीड पट हमीभाव, वाढीव खरेदी केंद्रे, ५६ लाख हेक्टरपेक्षा अधिक असलेले लघु सिंचन क्षेत्र, सशक्त करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादन संघटना, सरकार लागू करत असलेले नवे शेती सुधारणा कायदे या सर्वांचा त्यांनी उल्लेख केला. त्यावेळी या नव्या कायद्यांनी जुने कायदे रद्द झालेले नसून, या कायद्यांनी शेतकऱ्यांना अधिक अधिकार मिळाले आहेत असाही त्यांनी उल्लेख केला. एकूणच प्राथमिक क्षेत्राला दिलेल्या प्राधान्यांचा आढावा त्यांनी घेतला.
पर्यावरण विषयात विविध पावले सरकार टाकत आहे. ज्यात शेतकऱ्यांना सोलर पंप देणे, सोलर पॉवर प्लांट निर्माण करणे यासारखे विविध उपाय राबवले जात आहेत. त्याबद्दलही राष्ट्रपतींनी सांगितले. या बरोबरच पर्यायी इंधन म्हणून भारताच्या इथॅनॉल उत्पादनाच्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सांगितले.
याशिवाय सरकारच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. गरीबांच्या कल्याणापासून ते उत्पादन उद्योगाला चालना देण्यासाठी भारताने सशक्त करायला घेतलेल्या बँकिंग, ऑनलाईन पेमेंट मधील विविध सुरक्षा, या सर्वांचा त्यांनी आढावा घेतला.
राष्ट्रपतींना देशासमोर आलेल्या अडचणींबद्दल सांगताना चीनशी लढताना धारातीर्थी पडलेल्या शूर जवानांचा देखील गौरवपूर्ण उल्लेख केला.