भारताने शेजारधर्मादाखल श्रीलंकेला कोविड-१९चे पाच लाख डोसेस पुरवले आहेत. भारताने शेजारील देशांना मैत्री खातर कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे.
जगातील सर्वात मोठा लस उत्पादक असलेल्या भारताच्या सिरम इन्स्टिट्युटच्या लायसन्स अंतर्गत ऍस्ट्राझेन्का आणि ऑक्स्फर्ड विद्यापीठाने निर्माण केलेली लस बनवत आहे.
कोलंबो येथील विमानतळावर भारतीय राजदूत गोपाळ बगलाय यांनी कोविशील्ड ही लस श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या हाती सुपूर्त केली. या वेळी श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ दशलक्ष लोकसंख्येच्या या देशात लवकरच लसीकरण मोहिमेला सुरूवात होईल. ही सुरूवात पश्चिम भागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांपासून केली जाईल.
“या लसींचा पुरवठा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंती नंतर करण्यात आला आहे” असेही त्यांनी पुढे सांगितले.
श्रीलंकेत विविध पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुक केलेल्या चीननेदेखील तीन लाख लसींचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र चीनची लस अजूनही निर्मितीच्याच टप्प्यात आहे.
भारताने व्हॅक्सिन मैत्री जपत बांगलादेश, भूतान, मालदिव्हस्, नेपाळ, मॉरिशियस यांना मोफत लस दिली आहे आणि लवकरच अफगाणिस्तानलाही लस देणार आहे.
आफ्रिकेतही भारताच्या लसींचा पुरवठा
भारताने केवळ शेजारील राष्ट्रांसाठीच नाही, तर जगासाठी देखील आपल्या लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी भारताने ब्राझिल आणि मोरोक्को या देशांना देखील लस पुरवली होती. आता भारताने आपली लस आफ्रिकेला देखील पाठवली आहे. याशिवाय जागतिक लसीकरण धोरणांतर्गत संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील लसींचा पुरवठा करण्यात येईल.