संजय राऊत यांचा महाराष्ट्रातील सहकारी काँग्रेसला टोला
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असले आणि दररोज या सरकारस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत काँग्रेसची तारीफ करताना थकत नसले तरी गोव्यात मात्र काँग्रेसने शिवसेनेला झिडकारले आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग काँग्रेसला गोव्यात झेपला नाही, त्यामुळे त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल गोव्यात आहेत. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मी पण गोव्यात निघालो आहे. तिथे दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होईल. त्यावेळी किती जागांवर लढणार आहोत, कुठे कुठे लढणार आहोत, हे निश्चित होईल आणि त्याची घोषणा होईल. आपण एकत्र काम करावे, अशी आमची काँग्रेसबद्दल इच्छा होती. महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा असा प्रयत्न राष्ट्रवादी आणि आम्ही केला. पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना पेलली नाही, झेपली नाही. त्याच्यामुळे त्यांना आपण शुभेच्छा देऊ सत्तेवर येण्यासाठी.
हे ही वाचा:
पर्यटन बंद झाले आणि थायलंडमध्ये माकडांनी शहरांत घातला धुमाकूळ
कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा
बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या नागरिकांना सैनिकांनी वाचविले
संजय राऊत यांनी वेळोवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची बाजू लावून धरली आहे. गोव्यात काँग्रेससोबत जागा लढविण्याबाबत राहुल गांधी सकारात्मक होते, पण स्थानिक काँग्रेसचा मात्र वेगळा विचार सुरू होता, असे संजय राऊत म्हणाले होते. महाविकास आघाडीचा प्रयोग आता देशभरात होणार असा दावा राऊत हे वारंवार करत होते. पण प्रत्यक्षात जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर वगैरे राज्यांतील निवडणुकांत महाविकास आघाडी असा कोणताही प्रयोग होत नाही.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आणि राषअट्रवादी एकत्र असतील असा दावा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. तर गोव्यातही काँग्रेसने शिवसेनेला सोबत न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट होत आहे.