भारताचे माजी कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार २७ जानेवारी रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. शरद पवार यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या खास शैलीत अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा केला. अण्णासाहेब शिंदे यांचे भारतीय कृषिक्षेत्रात किती मोलाचे योगदान आहे यावरही पवारांनी प्रकाश टाकला. आपल्या १० वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर कृषी मंत्री पद ही किती आव्हानात्मक जबाबदारी आहे हे शरद पवारांनी सांगितले. माजी सनदी अधिकारी आणि शेती विषयाचे अभ्यासक गोकुळ पटनाईक यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली असून त्यांनी ‘भारतीय शेती’ या विषयावर आपले विचार मांडले.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती राहिले असून त्यांनी ‘अण्णासाहेब आणि भारतीय शेती’ या विषयावर आपले विचार मांडले. तर ‘महाराष्ट्रातील शेती’ या विषयावर नॅशनल फेडरेशन ऑफ कॉ.ऑप. शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी मार्गदर्शन केले.
सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी धडपडणाऱ्या एका शेतकरी नेत्याच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने शेती विषयक विचारमंथन आयोजित करून अण्णासाहेब शिंदे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली. आनंद शिंदे यांनी आपल्या भाषणाने या विशेष सोहळ्याचा समारोप केला.