पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अश्लील पोस्ट करणाऱ्या महेंद्र मोने या ठाण्यातील माणसाला भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने चांगलाच धडा शिकवला आहे. मोने यांच्या घरी जाऊन त्यांना ठाण्याच्या भाजपा महिला मोर्चाने चांगलाच इंगा दाखवला. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोने यांच्या तोंडाला काळे फासले असून त्यांना माध्यमांसमोर माफी मागायला लावण्यात आली.
ठाण्यातील घंटाळी पथ या परिसरात राहणारा महेंद्र मोने नावाचा व्यक्ती समाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता. पण प्रत्यक्षात मात्र समाज माध्यमांद्वारे सातत्याने भाजपा विरोधात विकृत आणि अश्लील लिखाण करताना तो आढळून आला आहे. सोमवार, १० जानेवारी रोजी मोने याने अशाच प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे फोटो वापरून तयार करण्यात आलेला एक विकृत व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री यांच्याबद्दलही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या.
हे ही वाचा:
यूपीएससीमध्ये मीरारोडच्या भावना यादवने केली कमाल!
‘दरवाजे ठोठावत बसण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घ्या’
नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले
कझाकस्तानच्या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू
सातत्याने करण्यात येणाऱ्या या आक्षेपार्ह, अश्लील आणि विकृत पोस्ट थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. तेव्हा भाजापाच्या महिला आघाडीने मोने यांना धडा शिकवायचा निर्धार केला. ठाणे भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांची फौज मोने यांच्या घरी धडकली. महेंद्र मोने याला त्याच्या पोस्ट्स संदर्भात या महिला कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले.
भाजपा महिला मोर्चाच्या या दणक्यानंतर महेंद्र मोने याने त्याच्या सगळ्या विकृत पोस्ट दिलीत केल्या असून. माध्यमांसमोर जाहीर माफी मागितली. तर यापुढे अशा प्रकारचे विकृत लिखाण करणार नाही असे सांगितले. या संदर्भात ठाणे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी या संदर्भात बोलताना असे सांगितले की, “लोकशाहीत टीकेला आणि विरोधी मताला महत्व आहे. पण ते मांडायची एक पद्धत असते. संविधानिक भाषेत केलेल्या टीकेचे स्वागतच आहे. पण मोने प्रमाणे कोणी विकृत आणि अश्लील भाषेत टिप्पणी करत असेल तर त्याला अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल.” मोने यांच्या या लिखाणा संदर्भात ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.