राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्याच्या ओमिक्रॉन व्हेरियन्टविरोधात उपयुक्त असलेले मोलनुपिरावीर मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण हे औषध एकीकडे उपयुक्त आहे असे म्हटले जात असताना ते काही बाबतीत धोकादायक ठरते असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे या औषधाविषयी अनेक शंकाकुशंकांना वाव मिळत आहे.
सध्या देशभरात विविध कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व तज्ज्ञ यांच्या मते मोलनुपिरावीर या औषधामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता ३० ते ५० टक्क्यांनी कमी होते. पण आयसीएमआरचे या औषधाबाबतचे मत मात्र वेगळे आहे. आयसीएमआरचे बलराम भार्गव यांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने हे औषध सुरक्षित नाही.
२०२१च्या अखेरीस सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सी.डी.एस.सी.ओ.) या संस्थेने स्पष्ट केले होते की, हे औषध केवळ तातडीने औषधांची गरज असेल तेव्हाच वापरले गेले पाहिजे. पण आयसीएमआरने मात्र या औषधाविषयी शंका उपस्थित केल्या. विशेषतः गर्भवती स्त्रिया, दुग्धपान करणाऱ्या स्त्रियांना या औषधापासून त्रास होऊ शकतो. जनुकीय बदल, अर्भकाच्या वाढीलाही या औषधामुळे बाधा निर्माण होऊ शकते.
राष्ट्रीय कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गोविंदराजन पद्मनाभन यांच्या मते सध्याच्या घडीला विषाणूंची बाधा रोखणारे कोणतेही औषध उपयुक्त आहे. शिवाय, सध्या कोरोना ग्रस्तांच्या वेगाने वाढत्या संख्या लक्षात घेता सर्वप्रकारची काळजी घेत मोलनुपिरावीरचा वापर करायला हरकत नसावी.
हरयाणातील एक डॉक्टर ध्रुव चौधरी म्हणतात की, या औषधाचे फायदेही आहेत. केवळ प्राण्यांना काही लक्षणे या औषधाच्या वापरामुळे दिसतात.