गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण त्यांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना तूर्तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
९२ वर्षीय लता दिदी यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे वय लक्षात घेता त्यांच्यावर घरीच उपचार करणे योग्य होणार नाही, हा विचार करून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले.
हे ही वाचा:
कझाकस्तानच्या दंगलीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू
‘दरवाजे ठोठावत बसण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घ्या’
यूपीएससीमध्ये मीरारोडच्या भावना यादवने केली कमाल!
नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी लतादिदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले होते.
भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लतादिदींनी आतापर्यंत विविध भाषांमध्ये २५ हजार गाणी गायली आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांचे चाहते चिंतित आहेत, पण तूर्तास चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.