ईडीचे मुंबईतील विभागीय कार्यालय वरळीच्या सी जे हाऊस येथे शिफ्ट होत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व ड्रग तस्कर इकबाल मिरचीची ही जागा मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जप्त केली होती. मात्र लिलाव करण्याऐवजी याच जागेत ईडी आता आपलं विभागीय कार्यालय थाटणार आहे.
इक्बाल मिरचीची डीएचएफएल प्रकरणाचा तपास करणार्या ईडीने वरळीतील सीजे हाऊस इमारतीच्या दोन मजल्यावरील मुख्य मालमत्ता जप्त केली होती. मिरची त्याची पत्नी हाजरा आणि मुलगे आसिफ आणि जुनैद यांना मनी लाँड्रिंगमध्ये सहभागासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले होते.
या आदेशानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मिरचीच्या १५ मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
अधिका-यांनी अलीकडेच सीजे हाऊसचा ताबा घेतला आहे आणि एक झोन कार्यालय वरळीला हलवण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या ईडीची दोन विभागीय कार्यालये बॅलार्ड इस्टेट येथील कैसर ई हिंद इमारतीत आहेत. अधिकारी मोठ्या जागेच्या शोधात आहेत आणि सीजे हाऊसमधील मिरचीची मालमत्ता जप्त केल्यामुळे, एजन्सी जागेचा वापर करण्यास तयार आहे.
प्रीमियम रिअल इस्टेटचे बांधकाम राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केले होते. मिरची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इमारतीत दोन मजले देण्यात आले होते. एक मजला ९ हजार चौरस फूट आणि दुसरा ५ हजार चौरस फूटामध्ये पसरलेला होता. आणि तिथेच मिरचीचा पब ‘ फिशरमन्स वार्फ ‘ होता. सीजे हाऊसच्या वरच्या मजल्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचे ३५ हजार चौरस फुटांचे निवासस्थान आहे.
हे ही वाचा:
कशी विश्वनाथ धाम येथील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ खास भेट
नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले
अंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला
सदावर्तेंना हटवून पेंडसेंची नियुक्ती; संप मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन
या प्रकरणी ईडीने मिरचीचे सहकारी आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्यासह अनेकांना अटक केली होती. मिरचीचे मुलगे आणि पत्नी हाजरा पूर्वी दुबईमध्ये राहायचे. आता ते युनायटेड किंगडममध्ये स्थलांतरित झाले आणि आजपर्यंत अनेक समन्स बजावूनही एजन्सीसमोर हजर झालेले नाहीत.