पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध हिल स्टेशन मुरी या डोंगराळ प्रदेशात पर्यटनासाठी लोकांची नेहमीच गर्दी असते. सध्या झालेल्या बर्फवृष्टीमुळे सुमारे एक हजारांपेक्षा जास्त पर्यटक रस्त्यातच अडकले आहेत. बीबीसीच्या बातमीनुसार शनिवारी बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या दहा मुलांसह २१ जणांचा वाहनातच मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे हे मृत्यू झाले आहेत.
मुरी या भागात चार फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. तर शेकडो झाडे देखील पडली आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत.
रावळपिंडी जिल्ह्यातील मुरीमध्ये हजारो वाहने शहरात दाखल झाल्यानंतर सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांचे असे रस्त्यावरच असहाय्य हाल झाले. पंजाब सरकारने मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गोंधळाची आणि आपत्कालीन परिस्थितीची दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री बुझदार यांनी अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारी कार्यालये आणि विश्रामगृहे उघडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पोलिस ठाणे आणि प्रशासन कार्यालयांमध्ये आणीबाणी लागू केली आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे कारमध्येच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे अनेकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. आपातकालीन बचाव सेवा ११२२ ने दिलेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पोलिस कर्मचारी त्याची पत्नी आणि सहा मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे.
हे ही वाचा:
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक
उपाहारगृहे, हॉटेल्स, नाट्यगृहे, मॉल यांच्यावर आता हे नवे निर्बंध
नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून एक लाखांपेक्षा जास्त पर्यटक मुरी येथे अडकले आहेत. आतापर्यंत २३ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. तर सुमारे एक हजार पेक्षा जास्त प्रवाशी गाड्यांसह रस्त्यावर अडकले आहेत.