साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या दोन महिन्यात पार पडणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून शनिवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
एकूण सात टप्प्यांमध्ये या पाच राज्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याच्या मतदान होणार असून या सर्व निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. पाच राज्यांमध्ये मिळून एकूण ६९० मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. ज्यामध्ये मतदानासाठी तब्बल १६२० मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा
चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर
कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका
… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले
उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकीसाठी १४ जानेवारीला अधिसूचना जाहीर होणार आहे. १० फेब्रुवारी , १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी , २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ०३ मार्च आणि ०७ मार्च अशा सात टप्प्यात उत्तर प्रदेश मतदान पार पडणार आहे.
तर पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. ८ जानेवारी रोजी या राज्यांसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर १४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.
मणिपूरमध्ये निवडणुकांचे मतदान हे दोन टप्प्यात पार पडणार आहे. ८ जानेवारीला निवडणूकीची अधिसूचना जारी होणार असून २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च या दोन दिवशी मतदान पार पडेल. या सर्व मतदानाचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.