पंजाबमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या संरक्षणात सत्तारुढ काँग्रेस सरकारकडून झालेल्या कुचराईचा देशभरात निषेध होतोय. पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून कॅ.अमरींदर सिंह अलिकडेच पायउतार झाले. त्यांना पद सोडणे भाग पाडण्यात आले. अमरींदर हे निवृत्त लष्करी अधिकारी असल्यामुळे पक्षीय धोरणापेक्षा देशहिताला त्यांनी कायम प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचे वारंवार हायकमांडशी खटके उडत होते. अखेर त्यांना पदावरून हटवण्यात आले. अमरींदर आज मुख्यमंत्रीपदी असते तर कदाचित मोदींच्या सुरक्षेबाबत घ़डलेला हा प्रकार झाला नसता.
एका पूलावर पंतप्रधानांचा ताफा १५ मिनिटे खोळंबला होता. ही कुचराई की सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे कट-कारस्थान हे लवकर उघड होईलच. परंतु पंजाबमधून पतरताना ‘मी विमानतळापर्यंत जिवंत येऊ शकलो त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा’, असा निरोप पंतप्रधानांनी पाठवला, त्यावरून त्यांच्या सुरक्षेशी छेडछाड करण्याचा प्रसंग किती बाका होता हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. मोदींच्या निरोपामध्ये उपरोध आणि संताप ठासून भरलेला आहे.
पंजाबमधील घटनेनंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसची तळी उचलत ‘केंद्रीय गृहमंत्री देखील घटनेला जबाबदार’ असल्याचे ट्वीट केले. ‘राजा पेक्षा राजनिष्ठ’ किंवा ‘चाय से किटली गरम’ या धर्तीवर संजय राऊतांच्या पावलावर पाऊल टाकत चतुर्वेदी यांनी काँग्रेसला साजेशी भूमिका घेतली. ज्या राज्यात पंतप्रधानांचा दौरा असतो त्या राज्याच्या प्रमुखांची काहीच जबाबदारी नाही? एसपीजीच्या नियमानुसार स्थानिक एसपीवर याची जबाबदारी असते. शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री किंवा राज्याचे पोलिस महासंचालक पंतप्रधानांसोबत असणे अपेक्षित असते. मुख्यमंत्र्यांना अगदीच शक्य नव्हते, तरी डीजीपी कुठे गायब होते? या आंदोलकांमुळे पंतप्रधानांना कोणताच धोका नसल्याचा बावळट युक्तिवाद पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. आंदोलकांकडून धोका होता की नव्हता हे चौकशी आधी यांना कसे कळले? आंदोलकांकडून धोका नाही हे एकवेळ गृहीत धरले तरी या परीस्थितीचा फायदा दहशतवादी गटांनी घेतला असता तर काय झाले असते?
हे ही वाचा:
पहिल्या ‘ममी’ वरील संशोधन पूर्ण! ‘ही’ तथ्ये आली समोर
ठाकरे सरकारची दडपशाही सुरूच! भाजपाचे जितेन गजारिया यांच्या कार्यालयात सायबर पोलीस
सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल फिरोजपूर एसएसपी निलंबित
ताफा अडविल्याप्रकरणी पंतप्रधानांना काय म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती?
पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार तो मार्ग ‘सॅनिटाईज’ असल्याचा हिरवा कंदील राज्याच्या डीजीपींनी दिल्याशिवाय पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकू शकत नाही. हवामान खराब असल्यामुळे पंतप्रधान रस्ता मार्गे कार्यक्रम स्थळी जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो रस्ता ‘सॅनिटाईज’ केल्याच्या सुचना मिळाल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकला, मग अचानक तिथे आंदोलक आले कसे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहीले आहेत. काही चॅनलवर त्या आंदोलकांसोबत पोलिस चहा पित असल्याचे फोटा झळकल्यानंतर पंजाब सरकारचे तोंड पार काळे झाले असून काँग्रेस या बेशरमपणाबद्दल काय उत्तर देणार हे आता पाहावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीविताला धोका असल्याची भाकीतं अनेक ज्योतिषांनी केलेली आहे. परंतु त्यांच्या जीवाला दगाफटका होण्याची शक्यता आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवाणीची गरज नाही. पंतप्रधान पदावर आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे देशाचा कारभार चालवला ती कार्यपद्धती याला जबाबदार आहे. देशापेक्षा काहीच मोठे नाही, देश हिताच्या आड जे येईल ते संपवायलाच हवे, असे धोरण ठेवून त्यांनी पावले उचलली. अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गेली सात दशके देशात निर्माण झालेली भ्रष्ट कार्यसंस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला.
नोटबंदीचा निर्णय ऐतिहासिक होता. नोटबंदीला पाच वर्षाच्या काळ लोटला तरी अनेकांना या निर्णयाने दिलेला घाव भरलेला नाही. नोटबंदीनंतर मोदींचे राजकीय विरोधक खवळले. सार्वजनिक पैसा लुबाडून फरार झालेल्यांच्या मालमत्ता विकून पैसा वसूल करण्याची तरतूद असलेल्या बेनामी मालमत्ता कायद्याने त्याची पुनरावृत्ती झाली. अनेकांची तळघरं उद्ध्वस्त झाली. या जखमा अजून भळभळतायंत. एकीकडे कठोर आर्थिक निर्णय घेत असताना त्यांनी कमल ३७० लागू करून पाकिस्तान आणि चीनला थेट अंगावर घेतले. ३७० च्या कुरणावर गबर झालेले कश्मीरातील राजकीय पक्ष रस्त्यावर आले. हा निर्णयही अनेकांच्या अर्थकारणाला चूड लावणारा होता. मेहबुबा, फारुक अब्दुल्ला यांच्यासारख्या विरोधकांनी थेट केंद्र सरकारला धमकावण्याचा प्रयत्न केला. सत्तेचे दुकान थाटून सोन्याचे महाल बनवणाऱ्यांना मोदी एकावर एक दणके देत आहेत. ज्यांनी देश विकून, जनतेला विकून पैसा कमावला, मोदींनी थेट त्यांच्या लंगोटीला हात घालण्याचे काम केले असून त्यात सातत्य राखले आहे.
मोदींच्या कारकीर्दीत राम मंदीर उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला. काशी विश्वनाथ आणि मथुरेचे श्रीकृष्ण मंदीर उभारण्याचा दरवाजाही किलकिला झालाय. मोदींच्या या प्रत्येक निर्णयामुळे समाजातील एक मोठा आणि प्रभावी गट नाराज झाला. देशात घडणारे हे परीवर्तन अनेकांना नको आहे. मोदींच्या नावाने दगडही तरतात असा अनुभव देशातील राजकीय विरोधकांना येतोय. त्यांचा महीमा सत्तेचे बालेकिल्ले नी गढ्या मोडीत काढतोय. मोदी नावाच्या वादळाने काँग्रेसचे पोतेरे केले. त्रिपुरासारख्या राज्यातील डाव्यांचा आणि उत्तर भारतात सतत अल्पसंख्यकांच्या मतांचे राजकारण करणाऱ्या समाजवाद्यांचा बालेकिल्ला ध्वस्त केला. कधी काळी महाराष्ट्रात भाजपाचा मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला राज्यात दुय्यम भूमिका घेणे भाग पडले. मोदी नामामुळे आपला बाजार उठत असल्याची जाणीव देशातील भाजपा विरोधकांना झाली आहे. ही जाणीव दुखरी आणि बोचरी आहे.
काँग्रसने देशात वर्षोनुवर्षे पोसलेल्या इको सिस्टीमला हाताशी धरून निर्माण केलेली वादळे मोदींना रेसभर मागे हटवू शकली नाहीत. त्यामुळे खलिस्तानवाद्यांना शेतकरी आंदोलनात उतरवण्याचा डाव खेळण्यात आला. या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील आणि देशाबाहेरील मोदीविरोधी शक्ती एकत्र आल्याचे आपण पाहीले. ‘आम्ही इंदीरा गांधींना मार्गातून हटवले मोदी काय चीज आहेत?’, अशा खुलेआम धमक्या देणारे आंदोलनकर्ते या आंदोलनाच्यानिमित्ताने देशाने पाहीले.
मोदींचे अस्तित्व हे अनेकांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरते आहे.
एकेकाळी चीन-पाकिस्तानकडून मार खाऊन पोकळ निषेध करणारा हा देश ताठ मानेने उभा राहतोय. काँग्रेसने सतत हेटाळणी केलेल्या धर्म-संस्कृतीची ध्वजा अभिमानाने मिरवतो आहे. काँग्रेसी संस्कृतीचा शिक्का असलेले ‘अंडरस्टँडींग’चे राजकारण रसातळाला जाते आहे. दलालांचा सुळसुळाट बंद होतोय हे अनेकांना पाहवत नाही. मोदी त्यांच्या डोळ्यात सलतायंत, कारण त्यांची दुकानदारी बंद होते आहे. बापजाद्यांच्या नावावर सुरू असलेली मिरासदारी संपुष्टात येत आहे. ‘प्रियांका वाडरा यांचे नाक इंदीराजींसारखे आहे’, अशी तर्कटे लोक फार मनावर घेताना दिसत नाहीत. वेगवान घोडदौड तर दूर राहीली, पायात मोडलेला मोदी नावाचा काटा यांना धड उभे राहू देत नाही.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला दूर दूर पर्यंत सत्ता दिसत नाही. मोदींच्या कामाचा धडाका असा आहे की, अशी कार्यक्षमता दाखवू शकेल, त्यांच्यासमोर उभा राहू शकेल असा नेता आजूबाजूला दिसत नाही. विरोधकांच्या डोक्यात संतापाचा लाव्हा खदखदतो आहे. काहीही करून मोदी नावाचा अडथळा मार्गातून दूर केल्याशिवाय आपले काही खरे नाही. या निष्कर्षावर विरोधक आलेले आहेत.
मोदींनी मोठ्या कष्टाने मांडलेला पट उधळून लावायचा असेल तर ते मोदींना हटवल्याशिवाय शक्य नाही. लोकशाही मार्गाने मोदी हटत नाही हे पुरते उमगल्यामुळे आता वाट्टेल त्या मार्गाने त्यांना दूर करणे हा एकच पर्याय विरोधकांकडे उरतो. सत्तेच्या उबेसाठी आसूसलेली काँग्रेस हा पर्याय स्वीकारणार नाही असे ठामपणे म्हणता येईल अशी परीस्थिती नाही. पंजाबच्या घटनेनंतर अवघ्या देशात निषेधाचे तीव्र स्वर उमटले. जनतेच्या मनात असेले प्रेम हे देशाच्या पंतप्रधानांचे कवच आहे. परंतु जनतेच्या मनातील हे प्रेम महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचे कामही करू शकेल याचे भान काँग्रेसने ठेवलेले बरे!
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)