सच्चाई छूप नही सकती, बलमा सिपाईया, मैने देखा तूने देखा, देखो देखो देखो बायस्कोप देखो अशा सुपर हिट गाण्यांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या सुचित्रा प्राॅडक्सन्सच्या ‘दुश्मन ‘ ( रिलीज पहिला शुक्रवार जानेवारी १९७२) च्या प्रदर्शनास यशस्वी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाचे निर्माते प्रेमजी हे असून दिग्दर्शन दुलाल गुहा यांचे आहे. या चित्रपटात मीनाकुमारी, राजेश खन्ना, मुमताज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच नाना पळशीकर, कन्हयालाल, रहेमान, असित सेन, सज्जन, अन्वर हुसेन, जाॅनी वाॅकर, लीला मिश्रा, के. एन. सिंग, मारुतीराव परब, मुराद आणि पाहुणी कलाकार बिंदू यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन वीरेंद्र सिन्हा यांचे आहे तर छायाचित्रण एम. राजाराम यांचे आहे. या चित्रपटाची गीते आनंद बक्षी यांची असून संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे आहे. विशेष म्हणजे मध्य मुंबईतील ताडदेव भागातील गंगा जमुना या जुळ्या थिएटरचे उदघाटन या चित्रपटाने झाले. तेव्हा दिलीपकुमारची खास उपस्थिती होती. या चित्रपटातील राजेश खन्ना आणि मुमताज हे कलाकारही हजर होते.