महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यांच्या जुहू बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बंगल्यातील एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर ३० कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच वेळी, सर्व 30 कर्मचाऱ्यांचे विलीगीकरण करण्यात आले आहे.
तसेच राज ठाकरे यांच्या ‘ शिवतीर्थ ‘ बंगल्यावरील एक कर्मचारी संक्रमित झाला आहे. आणि इतर कर्मचारांच्या अहवाल येणे बाकी आहे. यामुळे तूर्तास राज ठाकरे यांचे पुढील कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत.
हे ही वाचा:
‘बुल्ली बाई’ ऍप प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना
राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; मात्र निर्बंध कठोर करणार
सोशल मीडियावर दादलानीची खरडपट्टी
गतवर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. बिग बींना २२ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. याशिवाय, त्यांचा मुलगा आणि सून अभिषेक बच्चन ऐश्वर्या राय देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तेसच, राज ठाकरे यांनाही गतवर्षी कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी घरीच स्वतःचे विलीगीकरण केले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि बहिणीला लागण झाली होती
.
सध्या बॉलीवूडवर आणि राजकारण्यांवर कोरोनाची छाया पसरली आहे. अलीकडेच अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या ते दोघेही घरी क्वारंटाईन झाले आहेत. नेत्यांमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, युवासेना सचिव वरुण देसाई आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. याशिवाय विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.