प्रख्यात मुस्लिम महिलांच्या बनावट ऑनलाइन लिलावाने देशात तसेच परदेशात संतापाची लाट उसळली असतानाच, मुंबई पोलिसांनी त्वरीत बेंगळुरू येथील एका २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली, त्यानंतर उत्तराखंडमधील एका तरुणीला अटक करून तिला ट्रान्झिस्ट रिमांड वर मुंबईत आणण्यात आले आहे. ही महिला या सर्व प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात तिसरी अटक केली आहे हा तरुण देखील उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेल्या तरुणीचा मित्र असल्याचे समजते.
विशाल कुमार झा आणि श्वेता सिंह असे वादग्रस्त ‘बुल्ली बाई’ ऍप प्रकरणात मुंबई सायबर गुन्हे सेलने अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून तिसऱ्या आरोपीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या ऍपद्वारे १०० हून अधिक मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती, विशाल कुमार झा आणि सिंग हे एकमेकांना ओळखतात. ते फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. यामुळे शहर पोलिसांना झा यांचा माग काढल्यानंतर सिंगपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितले की, गिटहबवर होस्ट केलेल्या ‘बुल्ली बाई’च्या माध्यमातून गुन्हा करणाऱ्या लोकांनी स्वतःला खालसा शीख फ्रंटचे अनुयायी म्हणून दाखवले होते. गुन्हेगारांचा खलिस्तानी घटकांशी काही संबंध आहे की पोलिसांची दिशाभूल करण्याचा हा डाव होता याचा तपास सायबर पोलीस करत आहे.
हे ही वाचा:
‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार
सोशल मीडियावर दादलानीची खरडपट्टी
मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!
सूत्रांच्या म्हणण्यानुसार श्वेता सिंग या तरुणीने ऍपशी जोडलेली तीन खाती चालवत होती, तर झा याने “खालसा सुप्रीमॅसिस्ट” या नावाने खाते उघडले होते. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गुन्हे शाखेने आरोपी तरुणीला श्वेता सिंगला उत्तराखंडमधील स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतला आहे आणि तिला मुंबईत आणण्यात आले आहे.”
झा यांचे वकील डी. प्रजापती हे एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “माझ्या अशिलाला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माझ्या अशिलाला या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. पोलिसांनी शोध वॉरंट मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.” ‘बुल्ली बाई’ ही सुल्ली डील्सची क्लोन आहे जी गेल्या वर्षी वादात सापडली होती. दिल्ली, नोएडा आणि इतर ठिकाणी अनेक एफआयआर नोंदवण्यात आले असले तरी दोन्ही पैकी एकाही प्रकरणात यश आले नाही.