महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्याची ही वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगितले जात आहे. तसे असले तरीदेखील अद्यापही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये कोरोनाच्या बाबतीत संभ्रम असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारमधील मंत्रीच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे?
एकीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे लॉकडाऊन लावणार नसल्याचे सांगत आहेत. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख मात्र लॉकडाऊन लावला जाऊ शकतो अशा प्रकारचे सूतोवाच करताना दिसत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे.जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो अशाप्रकारचा इशारा दिला आहे. या संकटापासून बचाव व्हावा, अनेक संसार, लोकांचे जीव वाचावेत, अनेक कुटुंबावरील संकट दूर व्हावे म्हणून सरकार कदाचित याबाबतचा निर्णय घेऊ शकते असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
गतवर्षी UPI द्वारे पन्नास लाखाहून अधिक कोटी रुपयांचे व्यवहार
नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर
नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी
हरियाणामध्ये डोंगर खचला; एकाचा मृत्यू
तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तूर्तास तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारमार्फत सध्या तरी कडक निर्बंध लावण्याची तयारी असल्याचे समजत आहे. पण जर राज्यातील रुग्णसंख्या वाढली आणि तशी परिस्थिती उद्भवली तर मात्र लोकंडाऊन लावण्याखेरीज दुसरा पर्याय सरकारकडे नसेल असे टोपे यांनी म्हटले आहे.
तूर्तास लॉकडाऊनचा कोणताही विषय नसल्याचे टोपे सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभागाच्या टास्क फोर्ससोबत जी दोन तासांची प्रदीर्घ बैठक झाली त्यातही कुठे लॉकडाऊनची चर्चा नाही असे टोपे यांनी म्हटले आहे. तरीदेखील राज्य सरकार मधील मंत्रीच लॉकडाऊन बाबत वक्तव्य करत असल्यामुळे संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.