अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकन संसदेत महाभियोगाचा खटला सुरु आहे. या संदर्भात अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हमध्ये आधीच महाभियोग संमत झाला आहे. आता सिनेटमध्ये महाभियोगावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल वर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचिथावणीखोर भाषण देण्याचा आरोप करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसद परिसरात ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केल्या. त्यांनी संसदेच्या इमारतीत घुसून काचा फोडल्या आणि काही अनेक गोष्टींची नासधूस केली. काही समर्थक संसदेच्या हॉलमध्येदेखील शिरले. एक आंदोलक थेट स्पीकरच्या खुर्चीतही बसला. या संपूर्ण हिंसाचारात काही आंदोलकांचा मृत्यू झाला तर अनेक आंदोलक आणि पोलिसकर्मी गंभीर जखमी झाले.
अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटीव्ह मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्यामुळे त्या सभागृहात महाभियोग संमत करणे त्यांना सहज शक्य होते. सिनेटमध्ये मात्र महाभियोग संमत करण्यासाठी स्पष्ट बहुमत पुरेसे ठरत नाही. त्यासाठी दोन त्रितीयांश सदस्यांची सहमती आवश्यक असते. सिनेटमध्ये सध्याचे पक्षीय बलाबल हे ५०-५० असे आहे. त्यामुळे सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला कमीत कमी १७ रिपब्लिकन सिनेटर्सना ट्रम्प विरोधात मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. जे होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.