१ जानेवारी २०२२ चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णव देवी मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाली असून यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वैष्णव देवी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या काही तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असून चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे.
नवीन वर्षाची सुरुवात भगवंताच्या आशीर्वादाने करावी या उद्देशाने अनेक भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. देशातील लाखो भक्तांचे एक श्रद्धास्थान असलेले वैष्णोदेवी मंदिर इथेही दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. अशीच गर्दी याही वर्षी पाहायला मिळाली. मंदिराच्या गेट क्रमांक ३ पाशी दर्शनासाठी भलीमोठी रांग लागली होती. अशातच या रांगेत उभ्या असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर एका तरुणाने कोणाला तरी धक्का दिला आणि बघता बघता मंदिरात एकच धावपळ सुरू झाली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना खास भेट
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भक्तांना नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे समजते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आधी अशा प्रकारची दुर्घटना वैष्णव देवी मंदिरात घडली नव्हती.
या संपूर्ण घटनेची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठीही त्यांनी प्रार्थना केली. या चेंगराचेंगरीत आपला जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू-काश्मीर सरकार तर्फे दहा लाख रुपयांची मदत त्यांना देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जखमी झालेल्यांना केंद्र सरकार मार्फत ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जम्मू-काश्मीर सरकार दोन लाख रुपयांची मदत देणार आहे.