उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरी आयकर विभागाला मोठे घबाड सापडले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून मुंबईसह वेगवेगळ्या राज्यात आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. आयकर विभागाने कानपूर, कन्नौज येथे छापेमारी केल्यानंतर आता मुंबईतील तब्बल १४ ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत आठ व्यावसायिक आणि सहा रहिवासी ठिकाणांवर कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईतील विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मलाड, कांजूर मार्ग याठिकाणीचा समावेश असून मुंबईतील मालाडच्या अशोक एन्क्लेव्ह इमारतीवर छापा टाकण्यात आला. मालाडमधील आदीजीन परफ्युम्स, कांजुरमार्ग येथील आदी प्रॉपर्टी, विलेपार्लेमधील बॉटॅनिक्स नॅचरल्स इंडिया या कंपन्यांमध्ये धाडसत्र सुरू असून पियुष जैन हे या कंपन्यांचे संचालक आहेत.
हे ही वाचा:
‘राज्याचे अर्थमंत्री सिंधुदुर्गात येतात आणि पराभव करून जातात’
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व
दरम्यान, पियुष जैन यांच्यावरील छापेमारीवरून गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. पियुष जैन यांच्या छाप्यांचा समाजवादी पक्षाशी संबंध जोडण्यात आला होता. यावर समाजवादी पक्षातील नेत्यांनी याचा आणि समाजवादी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. पियुष जैन यांच्या घरातील छापेमारीतून आत्तापर्यंत सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली.