सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपाचा हा विजय म्हणजे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा दणका मानला जात आहे. या विजयामुळे भाजपाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपा नेते कार्यकर्ते ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत. तर त्याचवेळी दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला चिमटा देखील काढताना दिसत आहेत.
भाजपाच्या या विजयाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या विजयासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत इतर सर्व भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तर निवडणूकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पण असे असून देखील मतदारांनी लोकशाही निवडली असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व
श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार
सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष रिक्षासारखे आहेत. ते तसेच लढले आणि त्यांचे चिन्हही तेच होते. पण जनतेने त्यांना नाकारले असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान या विजयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनीदेखील फेसबुकवर एक पोस्ट करत महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. गाडलाच अशा कॅप्शनसह राणे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. राणेंनी टाकलेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.