जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील पांथाचौक परिसरात शुक्रवारी ३१ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून चार जवान जखमी झाले आहेत.
पोलिसांचे पथक एका संशयिताला पकडण्यासाठी म्हणून पांथाचौक येथील गोमंदर मोहल्ला येथे गेले होते. पोलिसांच्या पथकाने कारवाई दरम्यान संशयिताच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरातून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलीस आणि दहशतवादी यांच्यात गोळीबार झाला. या चकमकीमध्ये तीन पोलीस कर्मचारी आणि सीआरपीएफचा एक जवान असे एकूण चार जण जखमी झाले आहेत. तर तीन दहशतवादी मारले गेले. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुंबई हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली
महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत; आता राजस्थानला भिडणार
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट!!! लागू केली ‘ही’ नवी नियमावली
या चकमकीत मारले गेलेले दहशतवादी हे प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश- ए- मोहम्मदशी संबंधित होते. हे दहशतवादी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला श्रीनगरमध्ये पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सामील होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून यातील एका दहशतवाद्याचे नाव सुहेल अहमद राथेर असे आहे.