जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रोनने आता देशात आणि राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली असून ओमिक्रोन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यातच आता राज्यात ओमिक्रोनने पहिला बळी घेतला आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा प्रसार अधिक वेगाने होत असला तरी त्याचा धोका कमी असल्याचे सांगितले जात होते. अशावेळी देशात आणि राज्यात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेल्याने चिंता वाढली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी २८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची बाधा झाली होती असा अहवाल समोर आला आहे. हा रुग्ण नायजेरियातून प्रवास करून आला होता. त्याचा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर त्याच्या संपर्कातील आणखी दोन जणांना ओमिक्रोनची बाधा झाली असून हे दोन रुग्ण भुसावळमध्ये उपचारासाठी दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
बुटांनी काढला दहिसर बँक दरोडेखोरांचा माग
‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
‘हे’ असेल झाशी स्थानकाचे नवे नाव
मृत पावलेली व्यक्ती ही नायजेरियातून १२ डिसेंबरला भारतात आली होती. १७ डिसेंबरला त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. त्यानंतर तपासात हृदय विकाराचा सौम्य धक्का असल्याचे समोर आले. पुढील उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. म्हणून कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमिक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले. अहवाल प्रतीक्षेत असतानाच या रुग्णाची तब्येत सुधारली होती. पण २८ डिसेंबरला पुन्हा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात ती व्यक्ती मृत्यू पावली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.