सेंचुरियनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने दमदार कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळविला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींमुळे भारताने या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी २ बळी मिळवत भारताच्या या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली.
भारताने पहिल्या डावात ३२७ धावा करत या विजयाचा पाया भक्कम केला होता. भारताच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची मात्र दमछाक झाली. त्यांना पहिल्या डावात १९७ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. पहिल्या डावात भारताचा सलामीवीर के.एल. राहुलने १२३ धावांची केलेली खेळी मोलाची ठरली होती. मयंक अगरवालच्या ६० धावा आणि अजिंक्य रहाणेची ४८ धावांची खेळी ही देखील पहिल्या डावात भारताला भक्कम धावसंख्या उभारण्यासाठी उपयुक्त ठरली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने ७१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते.
हे ही वाचा:
वंडरलँडला २ जानेवारीपर्यंत ठोकले टाळे
नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी
महाराष्ट्राचा किशोर संघ बाद फेरीत; मुली मात्र साखळीतच गारद
दुसऱ्या डावात मात्र भारताचा डाव १७४ धावांत आटोपला. त्यात भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी धावसंख्या गाठता आली नाही. ऋषभ पंतच्या ३४ धावांची खेळी ही त्यातली सर्वोच्च खेळी ठरली. मात्र पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे लक्ष्य दिले. ते ओलांडताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १९१ धावांत आटोपला. पहिल्या डावापेक्षा ६ धावा दक्षिण आफ्रिकेला कमीच पडल्या.
स्कोअरबोर्ड : भारत ३२७ आणि १७४ विजयी वि. दक्षिण आफ्रिका १९७ आणि १९१ (डीन एल्गर ७७, टेम्बा बावुमा ३५, क्विन्टन डीकॉक २१, शमी ६-३, ३, बुमराह ५०-३, सिराज ४७-२, अश्विन १८-२)