पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान सरकारबाबत रविवारी धक्कादायक भविष्यवाणी केली. “इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकार लवकरच मोठी घोडचूक करेल.” असे विधान झरदारी यांनी केले.
पाकिस्तानमध्ये सगळ्या विरोधीपक्षांनी इम्रान खान सरकार विरोधात संयुक्त आघाडी उभारली आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट’ (पीडीएम) असे नाव या आघाडीला देण्यात आले आहे. “पीडीएम एकत्रितपणे सर्व बाजूंनी इम्रान खान सरकारवर हल्ला करेल.” असे झरदारी म्हणाले.
झारदारींचे कुटुंब अनेक वर्ष पाकिस्तानच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सर्वेसर्वा राहिलेले आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो या झारदारींच्या पत्नी होत्या. तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे वर्तमान अध्यक्ष बिलावल भुट्टो हे त्यांचे चिरंजीव आहेत. नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ आणि बिलावल भुट्टो हे पीडीएमचे नेतृत्व करत आहे.
“पाकिस्तानातील नवीन सरकार हे स्वतःच्याच चुकांनी अडचणीत येईल असे भाकीत मी पूर्वीच केले होते. आता केवळ पीडीएम त्यांना शेवटचा धक्का देईल.” अशी ग्वाही झारदारींनी दिली.
झारदारींसारख्या वरिष्ठ आणि सरकारमधील महत्वाच्या पदावरील व्यक्तीने असे संकेत वर्तवणं ही अत्यंत भीषण बातमी आहे. अशा प्रकारचे संकेत दिल्यामुळे पाकिस्तान पुन्हा कारगील सारखी चूक करणार का? अशी चिंता वर्तवली जात आहे.