आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि गुगलचे उच्च पदस्थ राहिलेल्या दोन भारतीयांनी सध्या गुगललाच पर्याय म्हणून जाहिरात मुक्त आणि ग्राहक केंद्री सर्च इंजिन बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला या वर्षाच्या मध्यापर्यंत यश लाभणे अपेक्षित आहे. निवा हे या नव्या सर्च इंजिनचे नाव असून सध्याच्या डेटा चोरीच्या काळात अशाप्रकारचे सुरक्षित सर्च इंजिन स्वागतार्ह्य आहे. बऱ्याचदा जाहिरातीसकट येणारी उत्पादने ही जाहिरातदारांसाठी, ग्राहकांपेक्षा अधिक उपयुक्त असतात, असा विचार करणाऱ्या श्रीधर रामस्वामी आणि विवेक रघुनाथ यांना निवा साकारण्याची इच्छा निर्माण झाली.
जाहिरातींमुळे जगात मोठ्या प्रमाणात सर्च इंजिन पसरले असले तरी काळाच्या ओघात अधिकाधीक जाहिराती दाखवण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. आम्हाला असा विश्वास आहे, की आम्ही यापेक्षा उत्तम दर्जाचे सर्च इंजिन तयार करून शकतो असे, ‘द इंडियन एक्सप्रेसशी’ बोलताना निवाचे कार्यकारी अधिकारी रामस्वामी यांनी सांगितले.
निवाच्या दोन निर्मात्यांपैकी रघुनाथन हे ‘आयआयटी मुंबई’ चे माजी विद्यार्थी आहेत, तर रामस्वामी हे ‘आयआयटी चेन्नई’ चे माजी विद्यार्थी आहेत. या दोघांनी अमेरिकेत गुगलमध्ये बराच काळ व्यतीत केल्यानंतर स्वतःचे गुगलपेक्षा वेगळे आणि सुरक्षित सर्च इंजिन चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवाने आत्तापर्यंत रामस्वामी स्वतः आणि ग्रेलॉक, सेक्युइआ कॅपिटल यांच्या सहाय्याने $३७.५ मिलियन उभे करण्यात यश मिळविले आहे.
निवा सध्या ४५ लोकांच्या चमूसह अमेरिकेत पहिले चार- पाच महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरू होण्यास सज्ज आहे. त्यानंतर इतर इंग्लिश भाषिक भाग जसे की पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया आणि भारत येथे त्यांची सेवा सुरू होईल. हे इंजिन खरेदी करून घेऊन मग वापरता येईल. सर्च इंजिनसोबतच ड्रॉपबॉक्स, इमेल आदी सुविधाही प्राप्त होतील. याशिवाय सुरक्षेच्या कारणासाठी यात केवळ शोधांव्यतीरिक्त दुसरा कोणताही डेटा साठवला जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.