पाठीवर बॅग आणि त्यात काही मौल्यवान वस्तू घेऊन गर्दीतून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पूर्वी चोर लोकांच्या पिशव्याच घेऊन पळून जायचे, पण बहुधा चोरांनी आता चोरी करण्याच्या नवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपल्या मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नयेत म्हणून केवळ बॅगेवर चांगली पकड ठेवणे पुरेसे नाही.कारण चोरटे आता नवनवीन तंत्र वापरून एखाद्याच्या बॅगेतील सामान चोरत आहेत. आता हे चोर बॅग चोरत नाहीत तर त्याऐवजी, ते बॅग असलेल्या व्यक्तीचा पाठलाग करतात आणि गर्दीचे ठिकाण साधून बॅगेतल्या वस्तू चोरतात.
२४ नोव्हेंबर रोजी आरोपी जावेद शेख (२०) याने शिवडी येथे गर्दीचा फायदा घेत रस्त्याने जात असलेल्या इसमाच्या पाठीवरच्या बॅगेची चेन उघडून तब्बल नऊ लाख सत्तर हजार किमतीचे २०८ ग्रॅम सोन्याचे दागिनेच पळविले. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत २६ नोव्हेंबर रोजी शेखला अटक केली आणि सहा लाख तीस हजार रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली आहे.
अशाच एका प्रकरणात पोलिसांनी अरमान शेख या २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पायधुनी परिसरात हार्डवेअर साहित्य खरेदी करण्यासाठी आलेला २७ वर्षीय तरुण मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावरून पायधुनीच्या दिशेने चालला होता, तेव्हा अरमान शेखने त्याच्या पाठीवरील बॅगेची चेन उघडली आणि दोन लाख वीस हजार रुपये घेऊन पळ काढला. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी गजबजलेल्या रस्त्यावर दुपारी ४.३० वाजता घडली.
विशेष म्हणजे, ” शेखची भायखळा कारागृहातून महिनाभरापूर्वी दुसऱ्या एका चोरीच्या गुन्ह्यात अनेक महिने कारागृहात घालवल्यानंतर सुटका झाली होती. त्याच्या विरोधात सुमारे १० चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे रेल्वे पोलिसांकडे नोंदवले गेले आहेत. तो फक्त १७ वर्षांचा असताना त्याला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले
…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !
कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा
शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
तपासकर्त्यांनी सांगितले की, यापूर्वी बॅग उचलणे हा सामान्य गुन्हा होता. मात्र, शहराच्या विविध भागांतून उघडकीस येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ बॅगेची चैन उघडून बॅगमधील मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. “कधीकधी एकच आरोपी चोरीला जातो. काही प्रकरणांमध्ये, दोन-तीन लोक चोरी करतात आणि बॅग उघडून मौल्यवान वस्तू चोरतात आणि ते तेथून पळून जाणाऱ्या इतर आरोपींना देतात. जर लोकांच्या बॅगेत मौल्यवान सामान असेल तर रस्त्यावरून चालताना सावधगिरी बाळगा,” एका अधिकाऱ्याने सांगितले.