नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांची नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तभंगाचा आरोप ठेवत नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने ही कारवाई केली आहे. ओली यांची प्राथमिक सदस्यता रद्द करण्यात आली आहे.
नेपाळमधील कम्युनिस्ट पक्ष गटबाजीच्या राजकारणात विखुररला गेला आहे. पुष्प कमल दहाल प्रचंडा आणि के.पी.शर्मा ओली यांच्या गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. प्रचंडा यांचा गट आपल्या विरोधात राजकारण करत असून अविश्वास प्रस्ताव आणून महाभियोग सुरु करणार होता असा आरोप ओली यांनी यापूर्वीच केला होता. याच कारणामुळे डिसेंबर २०२० च्या उत्तरार्धात २० तारखेला नेपाळमध्ये राजकीय पेच निर्माण झाला जेव्हा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी २७५ सदस्यांची संसद बरखास्त करायचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता. राष्ट्रपतींनी या प्रस्तवावर शिक्कामोर्तब केले ज्यामुळे आता ३० एप्रिल आणि १० मे रोजी नेपाळमध्ये निवडणुका होणार आहेत.
ओली यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई ही देखील प्रचंडा गटाकडून करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ओली आपला जुना पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनीनीस्ट) याचे पुनरुज्जीवन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१८ साली नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील ओली यांचा (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) गट आणि प्रचंडा यांचा (युनिफाईड माओइस्ट) असे दोन्ही गट एकत्रित करून युनिफाईड नेपाळ कम्युनिस्ट पक्ष तयार करण्यात आला होता.