‘भारत अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा नुकताच सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आता चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा सामान्य माणसांसाठी उपलब्ध झाला आहे.
इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान मोहिम श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली होती. त्यानंतर २ सप्टेंबर २०१९ रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत स्थापन करण्यात आला. चांद्रविज्ञानाशी निगडीत आठ विविध प्रयोग या मोहिमेद्वारे पार पाडले जाणार होते.
सर्व प्रयोग उत्तम रितीने कार्यरत असून, प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्याची क्षमता आहे, असे इस्रोकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समजते.
चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा बंगळूरूजवळच्या बेल्लारी येथील भारतीय अंतराळ विज्ञान केंद्राकडे (आय.एस.एस.डी.सी) जमा करण्यात आला आहे. जमा झालेला हा डेटा जगभरात वापरल्या जाणाऱ्या प्लॅनेटरी डाटा सिस्टिमच्या मानकानुसार प्रमाणित आहे. प्राप्त झालेल्या डेटामध्ये लवकरच नवीन आधुनिक डेटाची भर पडेल.