महाविकास आघाडी सरकारने आज त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केली असून यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते आमने सामने आले असून त्यांच्यात खडजंगी होताना दिसत आहे. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामावर टीका केली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपघाताने झालेले मुख्यमंत्री म्हटले आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून या सरकारने केंद्राने केलेली कामेही त्यांनी केल्याचे आपल्या खात्यात मांडले आहे, असा आरोप प्रकाश जावडेकरांनी केला आहे. ठाकरे सरकार हे संधीसाधू सरकार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’
… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
राज्यात भ्रष्टाचार असून कायदा सुव्यवस्था नाही. राज्याचे गृहमंत्री सहा महिने फरार होते आणि आता ते जेलमध्ये आहेत, असे कोणते राज्य असते? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त गायब होणं, ही वाईट बाब असल्याचेही जावडेकरांनी म्हटले आहे.
या सरकारला मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिले, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता विकत घेतली, असेही प्रकाश जावडेकर म्हणाले.