राज्याच्या गृहरक्षक दलाचे महासंचालक तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे तब्बल २३१ दिवसानंतर गुरुवारी मुंबईत दाखल आहे. मुंबईत दाखल होताच सिंग हे मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११च्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीकामी दुपारी १२ वाजता हजर झाले होते. गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्हयात परमबीर सिंग हे आरोपी असून त्याची गुन्हे शाखा कक्ष ११ मध्ये तब्बल साडे सहा तास चौकशी करण्यात आली असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सायंकाळी साडेसहा वाजता चौकशी पूर्ण झाल्यावर परमबीर सिंग गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.
परमबीर सिंग यांच्यावर मुंबईसह ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल असून त्यातील चार गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करीत असून गोरेगाव येथील हॉटेल व्यवसायिक बिमल अग्रवाल यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ करीत आहे. गोरेगाव येथील गुन्हे शाखेने या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यासह तिघांना अटक केली होती मात्र यागुन्ह्यात परमबीर सिंग सह रियाज भाटी आणि विनय सिंह हे मिळून येत नसल्यामुळे गुन्हे शाखेने त्यांना नोटीस पाठवून देखील ते चौकशीकामी हजर झालेले नव्हते.
दरम्यान गुन्हे शाखेकडून मुंबईतील किल्ला न्यायालयात परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिह यांना फरार घोषित करण्यात यावे असा अर्ज दाखल केला होता. गेल्या आठवड्यात किल्ला न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह तिघांना फरार घोषित करून ३० दिवसात हजर न झाल्यास तत्याच्या संपत्तीवर टाच येईल असा आदेश देण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर सिंग यांच्या मुंबईतील घरा बाहेर न्यायालयाची आदेशाची प्रत आणि नोटीस चिकटवण्यात आली होती.
दरम्यान सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला याबाबत अर्ज दाखल करून परमबीर सिंग हे भारतातच असून महराष्ट्र राज्य सरकार कडून होणाऱ्या कारवाईचाअंदाज असल्यामुळे ते समोर येऊ शकले नाही, आम्हाला वेळ देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परमबीर सिंग यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच परमबीर सिंग हे बुधवारी काही रिचेबल झाले आणि मी चंदीगड मध्ये असून लवकरच मुंबईत येत असल्याचे सिंग यांनी कळवले होते.
गुरुवारी सकाळी परमबीर सिंग हे ११ वाजता मुंबईत दाखल झाले आणि थेट मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या कार्यालयांत दाखल झाले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल आणि कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरिक्षक यांनी परमबीर सिंग यांची तब्बल साडेसहा तास चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला सायंकाळी साडेसहा वाजता सिंग हे गुन्हे शाखा कक्ष ११ च्या कार्यालयातून बाहेर पडले परंतु पत्रकारांना टाळत त्यांनी थेट दुसऱ्या गेटमधून खाजगी वाहनातून दक्षिण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परमबीर सिंग यांचे वकील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले कि, या गुन्हयात परमबीर सिंग यांच्याकडून तपास यंत्रणेला पूर्ण शक्रया करण्यात आलेले असून यापुढे देखील ते तपासात सहकार्य करतील. सिंग यांना चौकशीकामी पुन्हा बोलवण्याची शक्यता असून शुक्रवारी सिंग हे न्या. चांदिवाल आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात सिंग वैद्यकीय रजेवर गेले आणि तेव्हापासून ते हजर झाले नाहीत. या प्रकरणात गोरेगाव खंडणी प्रकरणात सिंग यांना अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून, मरिन ड्राइव्ह आणि ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या इतर कथित गुन्ह्यांसंदर्भात सिंग यांच्याविरुद्ध आणखी दोन वॉरंट जारी करण्यात आलेले आहेत.
हे ही वाचा:
I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट
शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार
परमबीर सिंग, बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझे आणि इतर आरोपींनी त्याच्याकडून ११.९२ लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिक यांच्या तक्रारीवरून २० ऑगस्ट रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “ते पूर्व सूचना देऊन समोर हजर झाले आहे आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्याने भविष्यातील कोणतीही कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल याबाबत अद्याप काही सांगू शकत नाही.”