परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटीच्या कथित वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्या. चांदीवाल आयोगाने गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आयोगासमोर हजर राहण्यास किंवा वॉरंटला सामोरे जाण्याची सूचना केली आहे.
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सिंग यांच्या वकिलांना परमबीर सिंग यांना आयोगासमोर हजर राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. गैरहजर राहिल्यास पोलिसांना त्यांच्याविरुद्ध अ-जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे निर्देश दिले जातील.
“जामीनपात्र वॉरंट अजूनही लागू आहे याची माहिती सिंग यांना द्या. आयोगासमोर सिंग यांची उपस्थिती सुनिश्चित करा अन्यथा त्यांनी हजर राहावे म्हणून पोलिसांना त्यांच्याविरुद्ध अ-जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे निर्देश दिले जातील,” असे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सिंग यांच्या वकिलाला सांगितले.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांची गुरुवारी चांदीवाल आयोगासमोर उलटतपासणी घेण्यात आली. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सरकारने आयोगाची स्थापना केली होती. अनिल देशमुख यांनी वाझे यांना पैसे गोळा करण्यास सांगितले तेव्हा संजीव पालांडे उपस्थित होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
हे ही वाचा:
I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला
छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट
वाझे याने आपल्या जबाबात म्हटले आहे की, पालांडे यांनी आपल्याकडे पैशांची मागणी केलेली नाही, परंतु आपण फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ज्ञानेश्वरी येथे पालांडे यांना भेटलो होतो आणि ते गृहमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी मान्य केले. तपास यंत्रणांना तपासात सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग जवळपास २३१ दिवसांनी गुरुवारी मुंबईत दाखल झाले, गोरेगाव येथील खंडणीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडून त्याचा जबाब नोंदवला गेला आहे. परमबीर सिंग आज (शुक्रवारी ) न्या. चांदीवाल आयोगाच्या चौकशीला सामोरे जातील अशी शक्यता आहे.