महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने चाप लावला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांबाबत मलिक हे सातत्याने वेगवेगळे आरोप सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदा घेऊन करत आहेत. त्यांना लगाम घालावा अशी मागणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात केली होती. त्यानंतर आपण सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत वानखेडे कुटुंबियांसंदर्भात कोणतेही ट्विट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करणार नाही, कोणत्याही माध्यमातून करणार नाही असे मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आता यासंदर्भातील सुनावणी ९ डिसेंबरला होणार आहे.
गेले काही दिवस मलिक हे सातत्याने वानखेडे कुटुंबियांवर आरोप करत आले आहेत. कधी ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा आरोप तर कधी समीर वानखेडे यांचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. हे आरोप करताना त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला तसेच पत्रकार परिषदांचे आयोजन करून आरोपांचा धडाका लावला. त्यामुळे शेवटी ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्याविरोधात सव्वा कोटींचा दावा दाखल केला आणि त्यात आता मलिक यांच्यावर न्यायालयाने लगाम घातला आहे.
Order
Respondent says will no tweets and make public statements shall be made against plaintiff and his family members whether directly or indirectly through any means of publicity for a week till next hearing.
Stand over to 9th
— Live Law (@LiveLawIndia) November 25, 2021
त्याआधी, नवाब मलिक यांनी २५ नोव्हेंबरला सकाळी समीर वानखेडे यांच्या आईचा धर्म त्यांच्या मृत्युपत्रावर मुस्लीम तर सरकारी कागदपत्रांत हिंदू असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
पडळकर, खोत एसटी आंदोलनातून बाहेर
समीर वानखेडे यांनी एनसीबीचे अधिकारी या नात्याने मलिक यांचे जावई समीर खान यांना मागे ताब्यात घेतले होते. समीर खान हे आठ महिने तुरुंगात होते. त्यांच्यावर ड्रग्स बाळगल्याचा आरोप होता.