सध्या आयकर विभागाची देशात अनेक ठिकाणी धडक कारवाई सुरू असताना आता गुजरातमधील गुटखा वितरक हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी गुजरात मधील आघाडीच्या गुटखा वितरक कंपन्यांवर आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली आहे. यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात मधील अहमदाबाद या शहरात एकूण १५ पेक्षा जास्त ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या शोधमोहिमेत अनेक संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल स्वरूपातील पुरावे आयकर विभागाला सापडले असून ते त्यांनी जप्त केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होते की या वितरकांनी अनेक गैरव्यवहार करून आपले करपात्र उत्पन्न लपवले आहे. तर त्यासोबतच करचुकवेगिरी केलीये. यामध्ये मालाच्या खरेदीचे हिशोब नसणे, मालाच्या किमती पेक्षा कमी किमतीच्या पावत्या तयार करणे, रोखीच्या व्यवहारांचा हिशोब नसणे असे प्रकार आढळून आले आहेत.
या जप्त केलेल्या मालाची पुढील तपासणी केल्यानंतर या मालाचा रूप खरेदीचा तपशील नोंदवला नसल्याचेही आयकर विभागाला आढळून आले आहे. या कंपनी मार्फत स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली असून ती उघड न केल्याचेही पुरावेही आयकर विभागाने शोधून काढले आहेत.
हे ही वाचा:
भावना गवळींना ईडीचे समन्स मिळालेच नाही!
मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक
निलेश साबळे म्हणाले, राणे साहेब पुन्हा अशी चूक होणार नाही!
उपराष्ट्रपतींचे निवासस्थान कुठे असावे हे पण सामान्य माणसाला विचारायचे की काय?
आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये एकूण साडेसात कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर चार कोटी रुपयांचे दागिनेही जप्त केले गेले आहेत. कंपनीचे लॉकर्स आयकर विभागामार्फत सील करण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईतून आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर यापैकी तीस कोटी पेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेची कबुली गुटका वितरक कंपनी यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणात आयकर विभागातर्फे पुढील तपास सुरू आहे.