क्रिकेट हा खेळ सध्या तीन फॉरमॅट मध्ये खेळला जातो, त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. खेळाच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि सातत्य टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला आपल्या फिटनेसचा दर्जा अधिक उंचावणे गरजेचे आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १३ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. क्षेत्ररक्षण हा क्रिकेट मधील सर्वात महत्वाचा घटक असून प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकांनी यावर अधिक भर देण्याची गरज आहे असेही वेंगसरकर पुढे म्हणाले, कारण एखादा चांगला टिपलेला झेल, वाचवलेली धाव अथवा अचूक फेक करून मिळविलेली धावचीतची विकेट या गोष्टी सामन्याचा कौल तुमच्या बाजूने झुकवू शकतात. यावेळी एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्सचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर गणेसा रत्नाम देखील उपस्थित होते.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी संघाने टायटन्स क्रिकेट अकादमीवर ७६ धावांनी विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करताना प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीने निर्धारित २० ओव्हर्स मध्ये ७ बाद १८७ धावांचे लक्ष्य उभारले. यात जय नाडर ५६, आर्यन पवार ४० आणि टी. शेट्टी ३३ यांचे मोलाचे योगदान होते. या आव्हानचा पाठलाग करताना टायटन्स क्रिकेट अकादमी संघाला २० ओव्हर्स मध्ये केवळ ७ बाद १११ धावा करता आल्या. डावखुरा स्मित केणी (३८) आणि आर्य कार्ले (३५) यांचे झुंजार प्रयत्न संघाला विजयी करण्यासाठी मात्र अपुरे ठरले.
डावखुरे फिरकी गोलंदाज सौरिश देशपांडे (१६/२) आणि टी. शेट्टी (१७/२) यांनी ही करामत केली. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जय नाडर याची तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सौरिश देशपांडे याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आदित्य बहुतुले, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून टी. शेट्टी तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून दर्शन राठोड यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि एजिस फेडरल इन्शुरन्सचे गणेशा रत्नाम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
हे ही वाचा:
परमबीर यांच्या घरावर चिकटविली ही नोटीस
ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…
… त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न
बनावट चॅटविरोधात नवाब मालिकांची क्रांती रेडकरने केली तक्रार
स्कोअरबोर्ड : प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी – २० षटकांत ७ बाद १८७ (जय नाडर ५६, आर्यन पवार ४०, टी. शेट्टी ३३ ) वि.वि. टायटन्स क्रिकेट अकादमी – २० षटकांत ७ बाद १११ (स्मित केणी ३८, आर्यन कार्ले ३५; सौरिश देशपांडे १६/२, टी. शेट्टी १७/२).