बीडमधील केज तालुक्यात चार दिवसांपूर्वी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव लवकरच जाहीर होईल असे म्हटले आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
हे ही वाचा:
पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला
लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज
योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!
‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’
केज तालुक्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बीडमधील शहरांमधील काही गोडाऊनवर छापे मारले. यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. खांडे यांनी मात्र आपल्याला यात गुंतवण्यात येत असल्याचे म्हटले होते.
कुंडलिक खांडे यांच्यावर इतरही आरोप असून बीड जिल्हा रोजगार हमी, चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणात खांडे यांच्यावर आरोप झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जागेत जुगाराचा क्लब देखील सुरू होता. आता गुटखा तस्करी प्रकरणात त्यांचे नाव समोर आले आहे. आता थेट शिवसेना भवनातून खांडे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.