सांसद आदर्श ग्राम योजनेची पूर्ती
सांसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत घेतलेल्या कोदाड गावातील विविध सोयीसुविधांचे राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामीनी लोकार्पण केले. कारुळकर प्रतिष्ठानच्या मार्फत लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर, राकेश कारुळकर, मूर्तजा व्होरा, सदस्य पप्पू यादव व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दत्तक घेतलेले तलासरी तालुक्यातील कोदाड हे अवघ्या २०२० लोकसंख्येचे गाव. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीच्या सीमेवर असलेले महराष्ट्रामधील शेवटचे गाव म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. या गावाची सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवड केली असून हे गाव दत्तक घेतले आहे.
त्या गावाचा विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कारूळकर प्रतिष्ठानमार्फत विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये थोरातपाडा येथे एक अंगणवाडीची सुंदर इमारत शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्या स्मरणार्थ बांधली आणि गावातील वाघोबादेवाचे मंदिर वी. के. आर. आचार्य मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांनी बनवून दिले असून खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील सोयीसुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मात्र बोटांवर मोजता येतील इतकी दोन-तीन छोटी कामे सोडली, तर या गावाचे इतर काम मात्र अद्याप व्हायचे आहे. खासदार स्वामी यांनी गाव निवडीनंतर पहिल्यांदाच गावाला भेट दिली आहे.
हे ही वाचा:
योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!
‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’
ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?
भाजपचे खासदार स्वामी यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना गावाला भेट देता आली नव्हती. मात्र आता कोदाड गावाला भेट दिल्यानंतर विविध विकास कामांना वेग येईल ही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सीमेवरील महाराष्ट्रातील कोदाड हे गाव अनेक समस्यांना आजही तोंड देत आहे. गावातील कच्चे रस्ते, गटारांसह इतर सर्वच समस्या या गावात आहेत. खासदार दत्तक योजनेमुळे गावाच्या विकासाला निश्चित चालना मिळेल.