जाधव-तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर
राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांची आपसातील धुसपूस ही काही नवी नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोकणात बघायला मिळत आहे. कोकणातील शिवसेनेचे काही पदाधिकारी फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर आता सुनील तटकरे विरुद्ध भास्कर जाधव हा कलगीतुरा चांगलाच रंगताना दिसत आहे. या घटनेनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात दापोली येथील काही शिवसैनिकांनी शिवसेनेला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवसेनेसाठी कोकणात हा चांगलाच धक्का मानला जात होता. यावरूनच कोकणातील शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपले मौन सोडत सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात
गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र
तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेच्या जागांवर पाठवण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. तर मुंबईतल्या कुणबी भवनाला पाच कोटींचा सरकारी निधी देण्याचेही आश्वासन राष्ट्रवादीच्या वतीने तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.
जाधव यांनी तटकरे कुटुंबातील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तटकरे यांनी २०२४ साली रिक्त होणारी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची जागा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या कार्यकर्त्यांना द्यावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. तटकरेंसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे. त्यांचे कुणबी समाजावर त्यांचे प्रेम आहे की ते सगळ्या गोष्टी केवळ कुटुंबासाठीच करतात हे त्यांना सिद्ध करण्याची ही एक नामी संधी आहे असे जाधव यांनी म्हटले आहे. तटकरे यांच्या कुटुंबातच एक खासदार आणि दोन आमदार आहेत याकडे जाधवांनी अप्रत्यक्ष बोट दाखवले आहे.