आयसीसी टी२० पुरुष विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने विजयाला गवसणी घातली आहे. न्यूझीलंड संघाचा त्यांनी तब्बल आठ विकेट राखून पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आणखीन एक आयसीसी स्पर्धा आपल्या नावे केली असून जगातील सर्वाधिक आयसीसी स्पर्धा जिंकणारा देश अशी आपली ओळख कायम ठेवली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच या स्पर्धेमध्ये नाणेफेक हा अतिशय महत्त्वाचा पैलू ठरला आहे. बहुतांशी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही खिशात घालतो असे चित्र पाहायला मिळाले आहे. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामनाही जिंकला.
फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात अडखळती झाली. पण नंतर कर्णधार केन विल्यमसनने फलंदाजीची सूत्र आपल्या हाती घेतली आणि सामन्याचे चित्र पालटले. ४८ चेंडूंमध्ये ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने २० षटकांत १७२ धावा केल्या.
हे ही वाचा:
‘महाआघाडी आणि रझा अकादमीच्या नेत्यांना ठाकरे पवार सरकारकडून अटक का नाही?
कुणाकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
सीबीआय, ईडी प्रमुखांचा कार्यकाळ वाढणार
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
१७३ धावांचे विजयी लक्ष डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. पण सुरुवातीलाच ट्रेंट बोल्टने कर्णधार ॲरॉन फिंच याचा काटा काढून ऑस्ट्रेलिया संघाला धक्का दिला. पण त्यानंतर दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने ३८ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या. तर मिशेल मार्शने ५० चेंडूत ७७ धावा करून नाबाद राहिला. वॉर्नर बाद झाल्यावर त्याला ग्लेन मॅक्सवेलनेही १८ चेंडूत २८ धावा करत चांगली साथ दिली. या सांघिक खेळाच्या जीवावर ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या १८.५ षटकांमध्ये १७३ धावांचे विजयी लक्ष्य अगदी लिलया साध्य करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. मिशेल मार्शच्या या धडाकेबाज खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.