जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली…
अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे वारकऱ्यांचे आणि विठू माऊलीचे नाते काय आहे याची कल्पना देते.
संपूर्ण वर्षभरात आपल्याकडे सण- उत्सवांची रेलचेल सुरू असते. या सर्वांमध्ये चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. सन २०२१ मध्ये १५ नोव्हेंबर (सोमवार) रोजी कार्तिकी एकादशी आहे. वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो.
गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनच्या निमित्ताने विठुरायाची आणि भक्तांची भेट हुकली होती. यंदा मात्र, निर्बंध शिथिल झाल्यामुळे आणि कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे कार्तिकीचा सोहळा पार पडणार आहे. नियम आणि अटींचे पालन करून आज १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या वारकऱ्यांना यावेळी पंढरपूरच्या यात्रेला जाता येणार आहे.
हे ही वाचा:
तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानले जाते.
तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात. कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच भजन- कीर्तनात तल्लीन होतात. विठ्ठलाची महापूजा करतात.