बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊन आलेला तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील वांद्रे पोलीस स्थानकात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या विरोधात वांद्रे पोलीस स्थानकात फसवणुकीची एफआयआर दाखल केली आहे. नितीन बरई यांच्या पोलिस तक्रारीनुसार राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्याला तब्बल १ कोटी ५१ लाख रूपयांना गंडा घातला आहे. २०१४-१५ साली फिटनेस कंपनीच्या नावाखाली शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दाम्पत्याने आपल्याला १ कोटी ५१ लाखांना फसवल्याचे नितीन बरई यांनी म्हटले आहे.
नितीन बरई यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० ब या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वांद्रे पोलीस याप्रकरणी तपास करत असून लवकरच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची चौकशी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज कुंद्रा वर सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा खटला सुरू आहे. या प्रकरणात अनेक दिवस त्याला जेलची हवा खायला लागली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे आता या फसवणुकीच्या नव्या प्रकरणामुळे त्याच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.