केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठ्या प्रमाणात एल.एच.बी पार्सल डबे बनविण्याचे आदेश दिले आहेत. या बरोबरच भारतीय रेल्वेला बदलत्या काळानुसार आधुनिक करण्यासाठी इ-पेमेंट, डिजीटल पेमेंट यांसारख्या तंत्रज्ञानाला अनुकूल बनविण्याचे देखील आदेश दिले आहेत.
देशातील छोट्या उद्योजकांसाठी रेल्वेची पार्सल सेवा महत्त्वाची ठरते. त्यामुळे रेल्वेने देखील छोट्या व्यापाऱ्यासांठी आपल्या पार्सल सेवेचा विस्तार करण्याचे योजले असल्याचे कळते.
हे ही वाचा: कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर, मालवाहतूकीवर रेल्वेचा सर्वाधिक खर्च
भारतीय रेल्वेचे देशभर व्यापक जाळे पसरले आहे. पूर्वोत्तर राज्ये, देशभरातील विविध बंदरे यांच्यावर भर देऊन त्यांना अधिकाधीक जोडून घ्यावे असेही सांगितल्याचे कळते.
पार्सल व्यवस्थेची हाताळणी करण्यासाठी स्वतंत्र पार्सल टर्मिनलची योजना करणार असल्याचे कळले आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या विविध विभागांपैकी काही स्थानके प्रायोगिक तत्त्वावर निवडण्यात आली आहेत. सांगोला (मध्य रेल्वे), काचेगुडा (दक्षिण मध्य रेल्वे), कोईंबतुर (दक्षिण रेल्वे) आणि कंकारिया (पश्चिम रेल्वे) या स्थानकांची निवड करण्यात आलेली आहे. मागील काही महिने रेल्वेने मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली आहे. रेल्वे सध्या शेती उत्पादनांच्या वाहतूकीसाठी किसान विशेष गाड्या चालवत आहे. त्याबरोबरच रिकाम्या परतणाऱ्या पार्सल गाड्यांसाठी विशेष सवलत देत आहे.