गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या संपाला भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली असून त्यांनी केलेल्या भाषणातून सरकारवर आणि अनिल परबांवर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. सदाभाऊ खोत यांना रात्रीच्या वेळी डास चावत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर त्यातले काही डास पकडून द्या अनिल परबांच्या घरात नेऊन सोडतो, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.
अनिल परब हे आमच्याच मातीतले आहेत. मग ते असे कसे? असा खोचक सवाल त्यांनी विचारला. सरकारकडून कामगारांसाठी कोणीही आलेले नाही. मात्र, शाहरुख खानच्या मुलासाठी त्यांना झोप लागत नव्हती, असेही नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया आज झाली पण त्यांना कणा दिला आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण झाले तर त्यांची वसुली कशी होईल असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच एसटी कर्मचारी आत्महत्या करतात म्हणजे तुमचा आमच्यावरचा विश्वास कमी झाला आहे, असेही नितेश राणे म्हणाले. मुख्यमंत्री कोरोना काळात जेव्हा घरी बसून होते तेव्हा हेच सर्व कर्मचारी लोकांना सेवा देत होते, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.
हे ही वाचा:
‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’
विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद पंड्या कालवश
महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार
वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप
शांततेत सुरू असलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असून आज एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, विलिनीकरणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही यावर कर्मचारी वर्गही ठाम आहे.