संयुक्त राष्ट्रसंघात धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने अनुमोदन दिल्याबद्दल भारताने त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. विशेष म्हणजे आपल्याच देशात धार्मिक स्थळांचा उध्वस्त होत असतानाही, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात अनुमोदन दिले आहे.
भारताने या बाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पाकिस्तानवर टिकेची झोड उठवली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात ‘शांतता आणि धार्मिक सहिष्णुता’ जोपासण्याच्या प्रस्तावासंदर्भात पत्रक प्रसिद्ध केले होते. यात पाकिस्तानच्या कृतीवर कठोर टिका करताना भारताने म्हटले की, पाकिस्तानसारख्या देशाला या प्रस्तावाच्या मागे लपता येणार नाही.
ज्या देशात नुकतेच मोठ्या प्रमाणात हल्ले करून हिंदू मंदिरांचा नाश करण्यात आला, ज्या देशात मानवी अधिकारांचे वारंवार उल्लंघन करण्यात आले आहे, त्या देशाने शांतता आणि धार्मिक सहिष्णुता जोपासण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन द्यावे हे अतिशय विरोधाभासी आहे.
पाकिस्तानात गेल्याच महिन्यात हिंदू मंदिर उध्वस्त करण्यात आले होते. याशिवाय पाकिस्तानात सातत्याने अल्पसंख्यांवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या विविध घटना समोर येत आहेत. त्या देशातल्या अल्पसंख्यांकांचे जिणे अवघड झाले आहे. पाकिस्तानची प्रतिमा आतंकवादाला पाठिंबा देणारा देश अशीच सातत्याने राहिली आहे. असे असतानाही पाकिस्तानने, संयुक्त राष्ट्रसंघात त्या प्रस्तावाला अनुमोदन दिेले आहे.