महाराष्ट्रात सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध भाजपा असा चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. नवाब मलिक यांनी बुधवार १० नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. तर या आरोपांनांतर फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आजचा सुविचार असे म्हणत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट केले आहे.
मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांचे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषींसोबत जमिनीचा व्यवहार असल्याचा बॉम्ब फोडला. यासंबंधी त्यांनी सर्व कागदपत्रे समोर ठेवली असून ही कागदपत्रे तपास यंत्रणांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नवाब मलिक यांनी आपण हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा:
‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार
९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन
हायड्रोजन बॉम्ब जो फुटलाच नाही
त्यानुसार पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. नोटबंदीच्या काळात फडणवीस यांच्या सुरक्षेत १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या खोट्या नोटांचा कारोबार सुरु होता असा आरोप मलिक यांनी केला आहे. तर हाजी अराफत, हैदर आझम, मुन्ना यादव यांच्यासारख्या गुंडांना फडणवीसांनी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे म्हटले होते.
नवाब मलिक यांच्या या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात की, ‘मी खूप आधीच शिकलोय की डुक्करासोबत कुस्ती खेळू नये. डुकराला ते आवडते आणि आपले कपडे खराब होतात’. फडणवीसांच्या या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून फडणवीस यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? याची चर्चा रंगताना दिसत आहे.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021