राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली होती. यावरूनच भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांना प्रतिउत्तर दिले आहे. मुंडे यांच्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
‘एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत. मात्र दुसरीकडे हे मंत्री नाच- गाण्याचे कार्यक्रम करत आहेत’, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. ‘अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे’, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी
एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता
‘आमच्या शक्तीपीठावर (शरद पवार) टीका केली की यश मिळते असे भाजपाला वाटत असेल. पण, असे प्रयत्न केले तरी जनता भाजपाला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ असे वक्तव्य धनंजय मुंडेंनी केले होते. मुंडे यांच्या या विधानाचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले ‘राज्यात विविध समस्या असताना सामाजिक न्यायमंत्री सामाजिक भान विसरलेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच– गाण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू! भाजपचा एक कार्यकर्ता देखील तुम्हाला पुरेसा आहे.’