मुंबई येथील क्रुज ड्रग्स प्रकरण हे सार्या देशभर चांगलेच गाजत आहे. रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होताना दिसत असून यात आता महाराष्ट्र सरकार मधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे नाव पुढे आले आहे. क्रुज पार्टीसाठी अस्लम शेख यांना बोलावण्यात आले होते असा दावा महाराष्ट्र सरकार मधील त्यांचे सहकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तर यावरून भारतीय जनता पार्टीने पलटवार केला असून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी अस्लम शेख यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
रविवार, ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत असे सांगितले की क्रुज ड्रग्स पार्टीला काशीफ खान याने अस्लम शेख यांना बोलावले होते. इतकेच नाही तर पार्टीला येण्यासाठी अस्लम शेख यांना वारंवार आग्रह करण्यात येत होता असाही दावा मलिक यांनी केला आहे. तर सरकारमधील मंत्र्यांच्या मुलांनाही या क्रुज पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते असे नवाब मलिक यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बुलढाणा पतसंस्थेत सापडलेले ते ५३.७२ कोटी कोणाचे?
महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे
अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
मलिक यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असा दावा केला की काशीफ खान यांने ड्रग्स पार्टीसाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना बोलावले. पण ते गेले नाहीत. अशी ओळख नसताना कोण कोणाला पार्टीसाठी का बोलवेल? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. तर नवाब मलिक यांनी सांगितले की त्यांना वारंवार येण्यासाठी आग्रह करण्यात आला त्यामुळे आता या प्रकरणात अस्लम शेख आणि काशिफ खान यांचा नेमका संबंध काय? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कंबोज यांनी केली. नवाब मलिक यांच्या मते काशीफ खान हा ड्रग पेडलर असून क्रुज पार्टीत त्यानेच ड्रग्स विकले होते. जर हे खरे असेल तर त्याचे अस्लम शेख यांच्यासोबत किती जवळचे संबंध आहेत? याचा तपास झाला पाहिजे.
नवाब मलिक यांनी असे सांगितले आहे की काही मंत्र्यांच्या मुलांना देखील क्रुज ड्रग्स पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तर ताज प्रेसिडेन्सी हॉटेल मध्ये अनेक नेत्यांची मुले काशीफ खान सोबत पार्टी करतात. ही कोणत्या मंत्र्यांची मुले आहेत? याचा खुलासा नवाब मलिक यांनी करावा असे आव्हान मोहित कंबोज यांनी दिले आहे. तर त्यांनी दाऊद इब्राहिमचा साथीदार चिंकू पठाण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत सह्याद्री बंगल्यात काय करत होता हा सवाल कंबोज यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.