लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या प्रत्येक देशामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार त्याचबरोबर निवडणुकीनंतर केले जाणारे सत्तेचे हस्तांतरण ह्या गोष्टी लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ह्याची जाणीव करून देतात. आफ्रिका खंडातील साहेल भागातील माली, नायजेर आणि बुर्किना फासो ह्या तीन देशांमधील २०२० रोजी निवडणूकां दरम्यान घडलेल्या घटना ह्या लोकसत्ताक राज्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर भाष्य करतात. माली मध्ये दहशदवाद्यांच्या कारवाया आणि सत्तेमधील लष्करी हस्तक्षेप ह्यामुळे लोकशाही केवळ मृगजळासारखी भासते. देशातील जिहादी हिंसेमुळे ६०% मतदान केंद्र बंद असणे हा प्रकार संपूर्ण जगाला बुर्किना फासो मधील गंभीर अस्थिरतेची दखल घ्यायला लावतो. तैवान प्रश्नावर ह्या देशाने बदलेली भूमिका हि बुर्किना फासोचे चीनप्रणीत भूमिकेचे समर्थन करतो.
पण ह्या बरोबरच नायजेर देशामधील पूर्वाध्यक्षांनी लोकशाहीला पूरक असा घेतलेला निर्णय संपूर्ण आफ्रिका खंडासाठी आशादायी ठरणारा आहे. तिन्ही देश शेजारी असूनही लोकशाहीची परस्पर विरोधी चित्रे आपल्या नजरेस पडतात. बहुतेक आफ्रिकन देशांमध्ये राष्ट्रपती पदाची मुदत व कार्यकाळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण घटनेला हवे तसे बदलून सत्तेत राहण्याची पळवाट अनेक नेते काढताना दिसत आहेत. वादग्रस्त निवडणूका, सामाजिक असंतोष, वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घालण्यासाठी सोशल मीडिया ब्लॉक्स आणि इंटरनेट शटडाउन सारख्या प्रकारांनंतर देखिलही आफ्रिका खंडात लोकशाहीचा विकास होत आहे.